नवी दिल्ली – गुजरात राज्यात प्रकल्प असलेल्या सुझुकी मोटार या कंपनीच्या उत्पादनावर सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे परिणाम झाला आहे. या महिन्यामध्ये कंपनीकडून अपेक्षेपेक्षा कमी वाहनांची निर्मिती होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सुझुकी कंपनी कारचे उत्पादन करून मारुती सुझुकी इंडियाला पुरवते. कारखान्यातील काम फक्त एकाच शिफ्टमध्ये केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जगभरात सध्या सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. आधुनिक कार निर्मितीमध्ये सेमीकंडक्टरचा महत्त्वाचा सहभाग असतो.
या महिन्यातील तीन शनिवारी उत्पादन होणार नाही. सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे. ज्या प्रमाणात सेमीकंडक्टर उपलब्ध होतील त्या प्रमाणात कारची निर्मिती केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या तयार होत असलेल्या कारमध्ये सेमीकंडक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
त्यामुळे जागतिक पातळीवर मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीने दहा लाख युनिट उत्पादनाचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. इतर कंपन्यांच्या उत्पादनावरही यामुळे थोडाफार परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.