नवी दिल्ली – ओमायक्रोनचा मुकाबला करण्यासाठी विविध राज्यांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे सेवा क्षेत्राच्या जानेवारी महिन्यातील उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. जानेवारी महिन्यात सेवा क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय 51.5 इतका नोंदला गेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हा निर्देशांक 55.5 इतका होता.
मात्र जानेवारी महिन्यामध्ये हा निर्देशांक 50 अंकांच्या वर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. गेल्या सहा महिन्यापासून सेवाक्षेत्राचा पीएमआय 50 अंकाच्या वर आहे.
ओमायक्रॉनमुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएएस मार्किट या संस्थेचे संचालक पॉलीना डी लिमा यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याबद्दल सेवा क्षेत्रातील उद्योगांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुरेशी मागणी नसताना उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागणार लागणार असल्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा एकत्रित पीएमआय जानेवारी महिन्यामध्ये कमी होऊन 53 इतका नोंदला गेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हा संयुक्त निर्देशांक 56.4 इतका होता.
आयात मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत कच्चा माल महाग असूनही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाचे दर अजून वाढविलेले नाहीत. वाढलेली महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंक काय करते हे 9 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या पत धोरणातून स्पष्ट होणार आहे.