घरांच्या दरांवर परिणाम

दरवाढीच्या क्रमवारीत भारत 54 व्या क्रमांकावर : गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 क्रमांकाची घसरण 

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावरही झाला असून यावर्षी जून अखेरच्या तिमाहीत भारतातील घरांचे दर 2 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. 

घरांच्या दरवाढीच्या जागतिक क्रमवारीत भारत 11 अंकांनी घसरून 54 व्या क्रमांकावर आला आहे. जगातील 56 देशांतील घरांच्या दराचा आढावा घेऊन नाईट फ्रॅंक या जागतिक पातळीवरील मालमत्ता क्षेत्रातील कंपनीने हा अभ्यास अहवाल तयार केला.

या अहवालात म्हटले आहे की, जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये भारत घरांच्या दरवाढीच्या क्रमवारीत 43 व्या क्रमांकावर होता. तो जून अखेरच्या तिमाहीमध्ये 56 व्या क्रमांकावर गेला आहे. जून अखेरच्या तिमाहीमध्ये 56 देशांतील घरांचे दर सर्वसाधारणपणे 4.7 टक्‍क्‍यांनी वाढले असले तरी भारतातील घरांचे दर मात्र दर 2 टक्‍क्‍यांनी कमी झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारतातील घरांचे दर कमी पातळीवर असूनही नागरिक खरेदीच्या मनःस्थितीत नाहीत. कारण भारतामध्ये बऱ्याच जणांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर नागरिक आहे तो पैसा साठवून ठेवण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे घरांचे दर कमी असूनही विक्री वाढत नसल्याचे दिसून येते. विकसकांनी भारतातील सर्व राज्यांना मुद्रांक शुल्कात कपात करण्याची विनंती केली आहे. मात्र, महाराष्ट्र वगळता कोणत्याही आतापर्यंत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

घर खरेदीसाठी योग्य वेळ
या घटनाक्रमाचे विश्‍लेषण करताना नाईट फ्रॅंक इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, भारतातील मध्यमवर्गीय आणि गरिबाची क्रयशक्‍ती कमी असल्यामुळे या काळामध्ये घरांच्या खरेदीसारखे मोठे निर्णय घेतले गेले नाहीत. त्याचबरोबर विक्री कमी झाल्यामुळे इन्व्हेंट्री वाढल्याने विकसकांना घराचे दर कमी करावे लागले. ज्याना गुंतवणुकीसाठी नाही तर वापरण्यासाठी घर हवे आहे त्यांना घर खरेदीसाठी सध्याची वेळ योग्य आहे. कारण घराचे दर बरेच कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर सध्या बॅंकांनी घराच्या कर्जावरील व्याजदर कमी केले असल्याचे बैजल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.