सोने महागल्यामुळे आयातीवर परिणाम

नवी दिल्ली – सध्या करोना व्हायरस व विविध देशातील संघर्षामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. परिणामी खरेदी कमी होऊन भारतामध्ये एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत सोन्याची आयात 47 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.

एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात भारताने केवळ 9.28 अब्ज डॉलरचे सोने आयात केले. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात चांदीची आयात ही 64 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 742 दशलक्ष डॉलरची झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत भारताने 17.64 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. मात्र परिस्थिती आता सुधारत असून आक्‍टोबर महिन्यात सोन्याच्या सोने आयातीत 36 टक्के वाढ नोंदली गेली आहे.

सोने आणि चांदीची आयात कमी झाल्यामुळे भारताच्या व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात भारताची व्यापारातील तूट केवळ 32 अब्ज डॉलर इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी या काळात ही तूट 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती.

भारत जगातील सर्वाधिक सोने आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये भारतामध्ये 800 ते 900 टन सोन्याची आयात वर्षाला होते. मात्र भारत सरकारने सोन्याची आयात कमी करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याची आयात कमी होऊ लागली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र जे दागीणे उत्पादक दागिन्यांची निर्यात करतात अशा उत्पादकांना काही सवलती देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.