लोकप्रतिनिधींचे पाठबळ ः लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा
प्राधिकरणाच्या जागेत अनधिकृतपणे पत्राशेड टाकण्याचे काम जोरात
चिखली – येथील जाधववाडी, कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामासह पत्राशेड मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फायदा उठवत अनेकांनी पत्राशेडसह बांधकामे केली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठबळातून ही बांधकामे होत आहेत. प्राधिकरणाच्या जागेवर भाजी मंडईसाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून अनधिकृत पत्राशेड बांधण्यात आले आहे. या बांधकामांकडे महापालिका जाणिवपूर्वक कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, उद्याने, क्रीडांगणे यासह स्वच्छतागृहाचा देखील अभाव आहे. तेथील नागरिकांनी पिण्याचे पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अनेक भागात रस्त्यावरच पाणी सोडले जात आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाणी साठून डासउत्पत्ती होवू लागली आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून धुर फवारणी देखील केली जात नाही.
चिखली, जाधववाडी परिसरातील बाह्य आणि अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. परिसरातील रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना देखील नाले साफसफाईचे कामे अजून सुरु झालेली नाहीत. नागरिकांच्या पाणी टंचाई, ड्रेनेजची साफसफाई, रस्त्यांची बिकट अवस्था, पथदिव्ये यासह पायाभूत सोयी-सुविधा अभाव दिसून येत आहे. एकीकडे पायाभूत सुविधांची बोंब असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकामे फोफावत आहेत.
अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे, पत्राशेडची उभारणी जागोजागी होवू लागली आहे. याकडे बांधकाम विभागाचे बीट निरीक्षक, उपअभियंता हे आर्थिक संगनमताने अनधिकृत बांधकामे वाढवण्यास पाठबळ देत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरुन एका बांधकाम व्यावसायिकाने नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृतपणे पत्राशेड मारुन भाजी मंडई तयार केली आहे. परवानगी नसताना भाजीमंडईचा घाट कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने नागरी समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होवू लागल्याचा सूर आहे.