imp news | आगामी निवडणुका भाजपकडून “स्वबळा’वर

ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून

पुणे – पुणे जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था आदी निवडणुका भाजप स्वबळावर लढाणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचना भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जा तथा उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

बावनकुळे यांनी जिल्ह्यात झंझावती दौरा करीत ठिकठिकाणी युवा वॉरियर्सच्या शाखांची सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी स्थानिक प्रश्‍नांची माहिती घेत नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहा,

असे आदेश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह त्या-त्या ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

“ते’ महाविकास आघाडीला जमले नाही

नारायणगाव- उर्जामंत्री असताना पहिल्याच वर्षी महाराष्ट्रातील 27 हजार गावे लोडशेडींग मुक्‍त केली होती. 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्षांत 28 हजार कोटींची वीज दिली.

कोणाचेही वीजजोड कापले नाही; परंतु महाविकास आघाडीला ते करता आले नाही, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथे केला.

भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका जनसंपर्क कार्यालय व युवा वॉरियर शाखेचा शुभारंभ करण्यात आले, त्यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी युवा वॉरियरच्या तालुका अध्यक्षपदी दिनेश परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भगवान घोलप, सचिव सुनील शहा, रोहिदास भोंडवे, जुन्नर तालुका अध्यक्ष संतोष तांबे, कार्याध्यक्ष अमोल शिंदे, सरचिटणीस मयूर तुळे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव, आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून आलेल्या पैशातून ग्रामपंचायतींना आराखडा तयार करून मागितला व तो पैसा ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील दिव्यांचे विजबिल भरण्यासाठी राज्य सरकारने सांगितले. वास्तविक हे विज बिल राज्य सरकारने भरणे आवश्‍यक आहे.

आम्ही याबाबतीत उच्च न्यायालयात आवाहन देणार आहोत.15 व्या वित्त आयोगातून विज बिल भरणे चुकीचे असून ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणू नका. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.