पुणे – पत्नीशी अनैतिक संबंधाच्या वादातून मित्रानेच काठीने घाव घालून तरुणाचा खून केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. बालाजी पखाले (वय 30, रा. वडकीगाव) आरोपीचे नाव आहे. तर, विशाल ओव्हाळ (25, रा.फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबध होते.
मृत तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, विशाल हा दि.29 रोजी घराबाहेर पडला. मात्र, तो दि.30 सप्टेंबरपर्यंत परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलीस दिली. दरम्यान, त्यांना विशालच्या मित्राने “विशालचे बालाजीच्या पत्नीशी संबंध असल्याने त्या दोघांची 29 सप्टेंबरला भांडणे झाली. आरोपीने विशालला “काटा काढीन’ अशी धमकी दिल्याची माहिती दिली.
आरोपी हा बांधकाम साइटवर ठेकेदार आहे. तसेच मृताच्या वडिलांचाही हाच व्यवसाय असल्यामुळे त्यांचात परिचय होता. यातूनच विशालची व आरोपीच्या पत्नीची ओळख आणि प्रेमसंबध निर्माण झाले. यामुळे बालाजी अस्वस्थ होता. घटनेच्या चार-पाच दिवस आधी बालाजी व त्याची पत्नीत याच विषयावरून भांडणे झाली होती. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. घटनेच्या दिवशी आरोपी व विशाल हे दारू पिण्यासाठी बसले. विशालने ही माहिती मित्राला दिली होती. दारू पिल्यानंतर आरोपीने विशालला फुरसुंगी कॅनॉल परिसरात नेले आणि दांडक्याने घाव घातला.
यात विशाल कोसळला. विशाल मृत झाल्याची खात्री होताच, मृतदेह आणि त्याची गाडी कॅनॉलमध्ये फेकली. यानंतर आरोपी वाद मिटवून पत्नीला घेऊन आला आणि त्याने विशालचा काटा काढल्याचे सांगितले. त्यावर ती मोठ्याने रडू लागली आणि पुन्हा माहेरी गेली. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय चव्हाण, कर्मचारी नितीन मुंढे, अकबर शेख, राजू वेंगरे, प्रताप गायकवाड यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.