कराडच्या घाटावर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

ऋषी पंचमीच्या साहित्य खरेदीसाठी व स्नानासाठी तालुक्‍यातील विविध गावांतील महिलांची गर्दी
कराड  – कराडसह तालुक्‍यात मोठ्या जल्लोषात स्वागत करीत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी कराडमधील सरदार डुबल-इनामदार, साळोखे यांच्यासह तालुक्‍यातील विविध ठिकाणी दीड दिवसाच्या गणरायाचे भावमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. तर याच दिवशी ऋषीपंचमीचा उपवास असल्याने तालुक्‍यातील विविध गावातील महिलांनी मंगळवारी सकाळी कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर स्नानासाठी गर्दी केली होती.

गणरायाचे आगमन झाले की दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी उपवास असतो. या दिवशी अनेक महिला नदीकाठावर स्नानासाठी जमतात. येथील कृष्णा-कोयनेच्या पवित्रतिरी स्नान करण्यासाठी तालुक्‍यातील महिलांनी गर्दी केली होती. स्नानानंतर वाळवंटात महादेवाची पिंड बनवून तेथे पूजा-अर्चा करण्यात आली. तसेच कृष्णाबाईचे दर्शन घेतले. यावेळी वाळवंटात महिलांच्या सोयीसाठी पालिकेच्या वतीने प्रसाधनगृहांची सोय करण्यात आली होती.

दरम्यान ऋषीपंचमीसाठी लागणारे उपवासाचे तांदूळ, पूजेचे साहीत्य, दुर्वा, फुले, विविध प्रकारची कंदमुळे, भाज्या यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात एकच गर्दी केली होती. यावर्षी अतिवृष्टीमुळे उपवासाच्या साहित्याच्या किमतीत व भाजीपाल्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसले. प्रीतिसंगमावर सुध्दा उपवासाचे साहित्य विक्रेत्यांनी उपलब्ध केल्यामुळे याच्या खरेदीसाठीही घाटावर महीलांनी गर्दी केली होती. मात्र महागाईचे सावट असल्याने महिलांनी नाराजी व्यक्‍त केली. एकंदरीत गणेशोत्सवाच्या वातावरणातच महिलांचेही पारंपरिक सणांचा समावेश असल्याने सर्वत्रच मंगलमय वातावरण तयार झाले आहे. मंगळवारी दीड दिवसाच्या गणेशाचे भावमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.