पुणे – महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडून घरीच मूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत आतापर्यंत 1921 मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, 993 मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन झाले असून 928 मूर्तींचे दान करण्यात आले. दरम्यान, मागील वर्षी पहिल्या पाच दिवसांत सुमारे 53 हजार मूर्तींचे विसर्जन झाले होते.
ज्या नागरिकांना घरीच गणेशमूर्ती विसर्जन करणे शक्य नाही त्यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर दोन याप्रमाणे 30 फिरत्या विसर्जन रथांची सुविधा केली असून त्यासाठी मार्गही निश्चित केले आहेत.
गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी 205 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. 99 मूर्ती दान करण्यात आल्या. तर मागील पाच दिवसांत एकूण मूर्ती विसर्जनाची संख्या 1921 आहे.
मूर्ती विसर्जन हौद, मूर्तिदानाविषयीचे नियोजन, वेळापत्रक जाहीर
मूर्ती विसर्जन हौद आणि मूर्तिदान करण्याविषयीचे नियोजन महापालिकेने जाहीर केले. गौरींबरोबर विसर्जन होणाऱ्या सहाव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशीचे नियोजन नागरिकांना करता येणार आहे. महापालिका क्षेत्रातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही ठिकाणे ठरवण्यात आली असून, प्रामुख्याने यामध्ये महापालिकेच्या शाळांच्या ठिकाणांचा समावेश आहे.
क्षेत्रीय कार्यालयनुसार मूर्ती संकलन केंद्र आणि कंसात अमोनियम बाय कार्बोनेट वितरण केंद्रांची संख्या
नगररस्ता-वडगावशेरी 16 (10), ढोलेपाटील 10 (10), कोंढवा येवलेवाडी11 (11), औंध-बाणेर 14(13), शिवाजीनगर घोलेरस्ता 10 (19), हडपसर-मुंढवा17(17), कसबा-विश्रामबाग 27 (24), भवानीपेठ क्षेत्रीय 9 (15), धनकवडी-सहकारनगर 20 (15), वारजे-कर्वेनगर 8 (13), कोथरूड-बावधन 14 (13), बिबवेवाडी 14 (12), येरवडा-कळस-धानोरी 3 (13), सिंहगडरस्ता 11 (15), वानवडी-रामटेकडी 7 (14).