लगेच काढून घेतली जाते IPOतील गुंतवणूक; महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातमधील गुंतवणूकदार आघाडीवर

मुंबई – या वर्षात बऱ्याच कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे म्हणजे आयपीओ आधारे शेअर बाजारावर नोंदणी केली आहे. या आयपीओला भारतातील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र शेअर खरेदी करणारे गुंतवणूकदार ही गुंतवणूक जास्त दिवस बाळगत नाहीत असे दिसून येऊ लागले आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेने यासंदर्भात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की 52 टक्के गुंतवणूकदार शेअरची शेअर बाजारावर ज्या दिवशी नोंदणी होते त्याच दिवशी शेअर विकून टाकतात.

तर 20 टक्के गुंतवणूकदार एक आठवड्यानंतर या शेअरची विक्री करतात असे दिसून आले आहे. मात्र आयपीओमधील शेअर खरेदी करण्याकडे ओढा वाढला असल्याचे दिसून येत आहे. या अगोदर मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गेल्या पुर्ण वर्षात 5 लाख 10 हजार गुंतवणूकदारांनी आयपीओची खरेदी केली होती. मात्र यावर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये 5.7 लाख गुंतवणूकदारांनी आयपीओमधील शेअरची खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे.

आयपीओमधील शेअर खरेदी करण्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातमधील गुंतवणूकदारांचा दोन तृतीयांश इतका वाटा आहे. आता अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे. त्याचबरोबर करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची शक्‍यता आहे. या वर्षात आतापर्यंत 40 आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी 68 हजार कोटी रुपये उभे केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.