पिरंगुट – मुळशी तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अधिकाधिक व लवकर मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून केली.
मुळशी तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाला सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट पाहणी केली. पाच दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे शेती, घरे आणि रस्त्याचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली आहे.
विशेषतः मुळशी धरण भागात याचा अधिक तडाखा बसला आहे. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी माले येथील दुर्गम हिवाळीवस्तीत नुकसानीची पाहणी केली.
तसेच आंदेशे – मांदेडे येथील पुलाची पाहणी केली. माले येथील हिवाळी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागरिकांसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी 11 हजार रुपयांची मदत केली. चाकणकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, उपसभापती विजय केदारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, युवक अध्यक्ष प्रवीण धनवे,
दीपाली कोकरे, चंदा केदारी, उज्वला मारणे, वारकच्या सरपंच शिल्पा पोकळे, सुहास शेंडे, सुहास दगडे, गणेश वाशिवले, सरपंच शिवाजी वीर, माजी सरपंच शिवाजी धुमाळ, उपसरपंच रामभाऊ वीर, विकास कुडले, विजय काळोखे आदी उपस्थित होते.