राजूर – अतिवृष्टीमुळे घरांचे ,शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आदिवासी शेतकरी व समाज सेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे यांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी, घाटघर, पाचनई, अंबित, एकदरे, शेणित, देवगाव, पिंपरकणेसह सर्व भागात गेल्या तीन चार दिवसांपासून सतत अतिवृष्टीमुळे नदी, नाले पाण्यामुळे भरून वाहत आहेत. या पुरामुळे वारंघुशी डावखांडी येथील रोडवरील मोऱ्या वाहून गेल्या. वाडी-वस्तीच्या जनतेचे हाल झाले. भात शेतीचे बांध फुटले. मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी. जहागीरदारवाडी, बारीसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भातशेती , घरांची भिंतीची पडझड होऊन, काही घरांचे कौले उडून नुकसान झाले.
तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी तहसिलदार यांना केली आहे .सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत. कोलटेंभे येथे काही जनावरे दगावली आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधित, नुकसान झालेले शेतकरी यांचे शेतीचे, घरांचे पंचनामे राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी अनंत घाणे, भरत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर यांनी केली आहे.