त्या ग्रामपंचायतीची खुली ई निविदा तत्काळ रद्द करा

तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव

वाघोली (पुणे) – शिरसवडी (ता.हवेली) येथील ग्रामपंचायतीची दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली ई-निविदा रद्द करण्याची मागणी तत्कालीन सदस्यांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीचा विकास आराखडा बदली केल्याबाबत ग्रामसेवक यांच्याविरोधात हवेली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

दि. 11 सप्टेंबर 2020 व दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत शिरसवडी यांच्यावतीने ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी निविदाबाबत कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकन मागणीचा व कोणत्याही प्रशासकीय मान्यतेचा ठराव केला नाही. तरीदेखील येथीलन ग्रामसेवक यांनी बोगस ठराव करून खुली ई निविदा प्रसिद्ध केली आहे. या कामाबाबत कोणताही उल्लेख विकास आराखड्यात आढळून येत नाही. असा आरोप माजी उपसरपंच बाळासाहेब गावडे, गणेश दगडे, रमेश कदम यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.

याबाबत बाळासाहेब गावडे यांनी सांगितले, की ग्रामसेवक रतन दवणे यांची बदली होऊनदेखील ते अध्याप शिरसवडी ग्रामपंचायतीचा कारभार का पाहत आहेत. गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देऊनदेखील त्यांना कार्यमुक्‍त करण्यात आले नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे बोगस ठराव करून ग्रामपंचायतीची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे ही खुली निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने खुली ई निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने संमती दिलेली आहे. निधी माघारी जाऊ नये यासाठी खुली निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. त्यासाठीच्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत.
– रतन दवणे, ग्रामसेवक शिरसवडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.