नवी दिल्ली – पॅन तात्काळ (रियल टाइम) देण्याच्या सुविधेचा आज केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रारंभ केला. वैध आधार क्रमांक आणि ‘आधार’कडे नोंदविलेला मोबाईल क्रमांक असलेल्या व्यक्तींनी पॅनसाठी अर्ज केला असेल, त्यांना आता ही सुविधा उपलब्ध असेल. पॅन देण्याची ही प्रक्रिया कागदविरहित असून अर्जदारांना इलेक्ट्रॉनिक म्हणजेच इ-पॅन विनामूल्य देण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प-2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, ‘तात्काळ पॅन देण्याची सुविधा लवकरच सुरू होईल’ असे म्हटले होते. त्यानुसार आधारवरील इ-केवायसी च्या माध्यमातून तात्काळ पॅन देण्याच्या सुविधेचा आज औपचारिक प्रारंभ झाला असला तरी, प्रायोगिक तत्त्वावर तिची ‘बीटा आवृत्ती’ यापूर्वीच म्हणजे 12 फेब्रुवारी 2020 रोजी आयकर विभागाच्या इ-फायलिंग संकेतस्थळावर सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून 6,77,680 तात्काळ पॅन वितरित करण्यात आली आहेत. 25 मे पर्यंतचा विचार करता, एका पॅनसाठी सुमारे दहा मिनिटे लागत होती.
तसेच, 25 मे पर्यंत एकूण 50.52 कोटी करदात्यांना पॅन देण्यात आले असून त्यापैकी सुमारे 49.39 कोटी पॅन हे वैयक्तिक करदात्यांना देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 32.17 कोटींपेक्षा अधिक पॅन हे आधारशी जोडले गेले आहेत.