देवी रोगाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात

पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्ता भरणे ः घेतली जेऊर येथील मेंढपाळांची घेतली भेट
नीरा  – जेऊर (ता. पुरंदर) येथील मेंढ्यांना आलेल्या देवीच्या रोगाने या परसरातील मेंढपाळांच्या मेंढ्या मृत्यू पावल्याप्रकरणी दै. प्रभातने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी (दि. 13) येथील धनगर वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून या रोगाबाबत माहिती घेतली. तसेच ज्या मेंढपाळांच नुकसान झाले आहे, त्यांना शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.

गेल्या एक महिन्यापासून जेऊर परिसरातील मेंढ्यांना देवीच्या रोगाने ग्रासले आहे. मात्र यावर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याची दखल घेत राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यामुळे वैद्यकीय टीमने मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून आजाराची निश्‍चिती केली. महसूल विभागाने देखील मृत मेंढ्यांचे पंचनामे केले. भरणे यांच्या या तातडीच्या कारवाईमुळे मेंढपाळांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, विराज काकडे, उत्तम धुमाळ, उपायुक्त शितलकुमार मुकणे, पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी विधाटे, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
जेऊर आणि परिसरातील मेढ्यांना लसीकरण करून या रोगावर नियंत्रणासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे टीम कार्य करणार आहेत. नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाच्यावतीने अनुदान देता येते का? याबाबत प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर मेंढ्यावर उपचार करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती योग्य कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातून एक स्वतंत्र टीम येथे दाखल झाली आहे. आता या भागातील मेंढ्यांमध्ये लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर मेढपाळांनी योग्य ते लसीकरण वेळोवेळी करुन घ्याव्यात म्हणजे अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
– डॉ. शितलकुमार मुकणे, विभागीय उपायुक्त पशुसंवर्धन विभाग.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.