वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानशी असलेले संबंध सध्या तोडून टाकले आहेत. जो पर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाचे अफगाणिस्तानला मान्यता देण्याबाबतचे चित्र स्पष्ट होत नाही आणि जो पर्यंत या समुदायाकडून अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार मान्य केले जाणार नाहीं तो पर्यंत हे संबंध प्रस्थापित होणार नाहीत असे नाणेनिधीने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील सध्याच्या अत्यंत बिकट स्थितीबाबत आम्हाला तीव्र चिंता आहे. त्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मानवतावादी भूमिकेतून काही तरी निर्णय घेणे आवश्यक आहे असेही नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस यांनी म्हटले आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही एखाद्या सरकारला मान्यता द्यायची की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय समुदयाकडून घेतला जातो.
आम्हाला या समुदयाकडून तशी कोणतीही सूचना अजून आलेली नाही. त्यामुळे आम्ही अफगाणिस्तान बाबतचे सर्वच निर्णय स्थगित ठेवले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पैशांचा वापर करता येणार नाही. गेल्या 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला र्आहे.
तालिबानही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारला अजून कोणीही मान्यता दिलेली नाही. सरकार स्थापने नंतर विविध विषयांवर तालिबान काय भूमिका घेणार आहे हे स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही त्यांच्या सरकारला मान्यता द्यायची की नाही यावर निर्णय होईल असे विविध जागतिक नेत्यांनी म्हटले आहे.