पुणे : राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा असा ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रदान करण्यात आला. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट’च्या (IMC RBNQA) वतीने २०२१ साठीचा गुणवत्ता पुरस्कार ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला शैक्षणिक वर्गवारीत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षी संस्थेला ‘माईलस्टोन मेरिट रिकगनेशन सन्मान’ मिळाला होता.
‘सूर्यदत्त’सोबत अन्य दोन शैक्षणिक संस्था आणि आठ कॉर्पोरेट्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त ग्रुप आणि एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुंबई या महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक संस्थेचा समावेश आहे. यासह जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना ‘जुरान क्वालिटी मेडल’ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अध्यक्ष जुझार खोराकीवाला, ट्रस्टचे अध्यक्ष नीरज बजाज आणि मेरिको लि. चे अध्यक्ष हर्ष मारीवाला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट ही मुंबईतील नामवंत संस्था असून गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी संस्थांना मार्गदर्शन करण्यात अग्रेसर आहे. ट्रस्टतर्फे दिले जाणारे पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे असून पुरस्कारार्थींना देशात गौरवाचे स्थान प्रदान करणारे आहेत. संस्थात्मक गुणवत्ता साधण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन रुजविण्यासाठी ट्रस्ट प्रोत्साहन देते. या पुरस्कारांसाठीच्या निवडप्रक्रियेचे चार टप्पे असून ती चार महिने चालते. नेतृत्त्व, रणनीतीचे नियोजन, ग्राहक केंद्रिता, मोजमाप, विश्लेषण आणि ज्ञान व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, कार्यान्वयनावरील लक्ष आणि अंतिम परिणाम या घटकांच्या आधारे या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते.