इस्लामपूर – युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखा केवळ पेहराव बनविण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करून अन्यायाविरुध्द पेटून उठावे, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले. पी. आर. पाटील ज्ञान प्रबोधिनी व हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कै. रामराव विठोजी पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील, रत्नकांता पाटील, संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, जि. प. सदस्य संजीव पाटील, पं. स. सदस्या धनश्री माने, सरपंच शोभा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
अमोल मिटकरी म्हणाले, देशात एनआरसी लागू करायचा असेल तर डीएनएवर लागू करा. म्हणजे कोण या देशातला आणि कोण बाहेरचा हे एकदा निश्चित होवून जाऊ द्या. नथुराम गोडसेचा उदो-उदो करणाऱ्या शरद पोंक्षेना महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील माणूस उभा केलेले योगदान दिसणार नाही, असा टोलाही त्यांनी लगवला. पी. आर. पाटील म्हणाले, छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणा सर्वांचे जीवन फुलविले आहे. आजच्या परिस्थितीत त्यांचे विचार घरा-घरापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.
काही प्रवृत्ती आपल्या स्वार्थासाठी या महापुरुषांचे विचार चुकीच्या पध्दतीने समाजात पसरवीत आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्ही. एन. पाटील, पी. टी. पाटील, प्रशांत पाटील, रघुनाथअण्णा पाटील, दिलीपराव खांबे, प्रकाश कांबळे, चॉंदसो तांबोळी, डॉ. धनाजी माने, दिग्विजय गायकवाड, बळीअण्णा पाटील, जयसिंग पाटील, बाबुराव वायदंडे, नंदकुमार कुलकर्णी, उपसरपंच संजय गायकवाड, संपतराव देवकर, डी. एल. पाटील, तांबवेचे अमोल चव्हाण, सुशांत पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.