रांची : जागतिक क्रिकेटमध्ये जरी मला कॅप्टनकुल या नावाने संबोधण्यात येत असले तरी मी देखील एक माणूसच आहे. मलाही भीती वाटते, मलाही दडपण येते, अशा शब्दात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
धोनीच्या खासगी प्रायोजकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतल्यानंतर बोलताना धोनीने अनेक गोष्टींचे कथन केले. सध्या करोनामुळे जगभरात अनेकांना फटका बसलेला आहे. भारतातही लॉकडाऊन केले असून सगळ्यांनाच आपापल्या घरातच थांबावे लागत आहे. माझ्या बद्दल सांगायचे तर मलाही घरीच राहावे लागत असल्याने कंटाळा आला आहे. मात्र, बाहेर पडण्याची मलाही भीती वाटते. विनाकारण घराबाहेर पडून निष्काळजीपणा केला तर केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही संकटात टाकत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे, असेही धोनीने स्पष्ट केले.
भारतीय क्रिकेटपटूंकडून सर्वाधीक अपेक्षा बाळगल्या जातात. आपल्या लाडक्या खेळाडूचीदेखील काही चूक होऊ शकते. त्यांचीही मानसिकता निराशाजनक बनू शकते हे आपल्या चाहत्यांना मान्यच नसते. आता करोनामुळे सगळे क्रीडाक्षेत्र ठप्प झाले आहे. अशा काळात स्पर्धा कधी सुरू होतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे घरातच राहिल्याने खेळाडूंनाही मानसिक ताण, दडपण येते हे समजुन घेतले पाहिजे. मी देखील एक माणूस आहे त्यामुळे मलाही भीती वाटते, दडपण येते, असेही धोनीने व्यक्त केले.
एम्फोर या सामाजिक संस्थेच्या या ऑनलाइन कार्यक्रमात धोनीने ही मते मांडली. ही संस्था भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एस. बद्रीनाथ याने एका भागीदारीत सुरू केली आहे. खेळाडूंच्या मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांना आधार देण्यासाठी कार्यरत असते. धोनी त्यांचा विशेष राजदूत आहे.
मानसिक त्रास हा आजार नव्हे….
आपल्या देशातील लोकांची विचार करण्याची पद्धत मला अनाकलनिय वाटते. करोनामुळे घरात थांबून अनेकांची मानसिकता निराशाजनक होते. मात्र, त्यामुळे त्यांना वेड लागले आहे असे का समजण्यात येते. हा केवळ एक मानसिक ताण समजला जावा. परिस्थिती बदलली की हा ताणही कमी होतो. क्रिकेटचे उदाहरण द्यायचे तर सामना कोणताही असो पहिली काही षटके खेळताना मनावर दडपण येते ताण येतो, ते मान्य करायला क्रिकेट शौकीनांनी शिकले पाहिजे, असेही मत धोनीने व्यक्त केले.