इमरान हाश्मीचा “चेहरा’ हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असणार आहे. रुमी जाफरीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अन्नू कपूर, धृतिमान चॅटर्जी यांसारख्या कलाकारांचा समावेश असणार आहे.
इमरान सांगतो की, हा एक वेगळ्या स्वरूपाचा चित्रपट असून यामध्ये माझा एक वेगळा लूक लोकांसमोर येणार आहे. आजवर मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहात आलो आहे. अनेकदा मला ही संधीही मिळाली; पण अमिताभ बच्चन यांची गोष्टच वेगळी आहे. प्रत्येक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तडफडत असतो आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी आतुर असतो. माझ्यासाठी तर ते प्रेरणास्थान आहेत, असे इमरान म्हणतो.
यावर्षी इमरान हाश्मीचा “इजरा’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. हा एक भयपट आहे. त्याच्या या चित्रपटांच्या परीप्रेक्ष्यातून पाहिल्यास त्याच्या टपोरीपणाच्या इमेजपासून त्याला मुक्ती मिळत आहे. इमरान म्हणतो, माझ्यासाठी इमेजेपक्षाही महत्त्वाचे आहे ते कथानक. मी आजवर ज्या व्यक्तिरेखा साकारल्या त्यामध्ये मी नायक असूनही हायफाय नसायचो. कारण ती चित्रपटाची गरज असायची. पण दोन्हीही ठिकाणी मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते प्रेक्षकांना माझा टपोरी स्टाईल अभिनयच जास्त आवडत गेला आहे!