मी ‘नोबेल’च्या योग्य नाही – इम्रान खान 

नवी दिल्ली – भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशी पाठविण्याचे पाऊल उचलल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली आहे. तसा प्रस्तावच पाकच्या संसदेत आणला गेला आहे. परंतु, आज इम्रान खान यांनी ट्विट करत मी नोबेल पुरस्काराच्या योग्य नसल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा सूर आवळला.

इम्रान खान यांनी म्हंटले कि, मी नोबेल पुरस्काराच्या योग्य नाही. तर काश्मिरची समस्या काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार सोडवेल आणि या क्षेत्रात शांती आणि विकास आणेल अशा व्यक्तीला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यात पाकपुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई करून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर पाकनेही भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताने प्रतिहल्ला केल्यानंतर भारताचे मिग-२१ हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये कोसळले. या विमानातील पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. इम्रान खान यांनी शांततेचे आवाहन करत भारतीय पायलटला सुखरूप सोडण्याची घोषणा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.