शालिनीताई विखे यांचे सूचक संकेत
नगर – आजपर्यंतच्या माझ्या कामावर मी समाधानी असून आता अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. मी या स्पर्धेत नसल्याचे दीड वर्षापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विषयच येत नाही. मी अध्यक्षपदासाठी अर्जही भरणार नाही.
मात्र,उद्या होणाऱ्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीच्या वेळी चमत्कार घडेल असे सूचक वक्तव्य पत्रकारांशी बोलताना करत अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी झेडपीतील सस्पेन्स कायम ठेवला आहे. आज जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या आदल्या दिवशी विखे जिल्हा परिषदेत आल्या होत्या.
त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्याच्या पदाधिकारी निवडीत मी स्पर्धेत नाही पण चमत्कार घडेल असे सांगताना कॉंग्रेसचा गटनेता निवडताना माझ्यासह दहा सदस्यांना विश्वासात का घेतले नाही याचे आश्चर्य व खंत वाटत असल्याचे सांगितले. आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत. ज्यावेळी गटनेता बदलण्याचा निर्णय झाला. त्यावेळी दुसऱ्या गटनेत्याची निवड करताना जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ तेरा सदस्यच उपस्थित होते.
आमच्या दहा सदस्यांनाही बोलावयाला हवे होते,असे विखे म्हणाल्या. तुमच्या दहा सदस्यांची उद्या काय भूमिका असेल यावर त्यांनी विखे गटाचा उपाध्यक्ष निवडीत कॉंग्रेस उमेदवाराला पाठींबा असेल पण अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने आमचा पाठींबा गृहीत धरू नये असे संकेत दिले आहेत.