Sandeep Kshirsagar on Viral Photo । बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वप्रथम आवाज उचलणारे आमदार संदीप क्षीरसागर हे एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सध्या त्यांचा आणि एका तरुणीचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच फोटोवर संदीप क्षीरसागर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही
संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापासून आक्रमकपणे लावून धरली. त्यानंतर आज बीड येथील मोर्चात सहभागी झाल्यानंतर त्यांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोबाबत संदीप क्षीरसागर यांनी खुलासा केला.
संदीप क्षीरसागर म्हणाले, “सध्या समोर येत असलेला फोटो निवडणुकीदरम्यान व्हायरल करण्यात आला होता. तो फोटो मॉर्फ केलेला आहे. मी कधीही इनशर्ट करत नाही. मी शर्ट बाहेर सोडलेले असते. या फोटोबाबत मी तक्रार केलेली असून फॉरेन्सिक तपासणीसाठीही सदर फोटो पाठवून दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात मी आवाज उचलू नये, म्हणून मला शांत करण्यासाठी असला प्रकार केला जात आहे. पण यानिमित्ताने एक सांगतो मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.”असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
तो फोटो सर्वात आधी बायकोला दाखवला.. Sandeep Kshirsagar on Viral Photo ।
पुढे संदीप क्षीरसागर यांनी, “सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर तो सर्वात आधी मी माझ्या पत्नीला दाखवला होता. पत्नीही तो फोटो पाहून हसली होती. राजकारणात कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात, हे त्या फोटोवरून दिसते. निवडणूक काळात तो फोटो व्हायरल करूनही लोकांनी मला विजयी केले. कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आगामी अधिवेशनात अशा मॉर्फ फोटोबाबत काहीतरी नियमावली असावी, अशी मागणी करणार आहे”, असे म्हटले.
दरम्यान, आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला गेला आहे. या मोर्चात मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगेही सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले, “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, आरोपींना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. आरोपींना तात्काळ अटक करा” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.