ऊस मजुरांना बार्टीकडून मिळणार कामगारांचे दाखले

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची सूचना : बार्टीत आढावा बैठक

पुणे – ऊस तोड कामगारांची लोकसंख्या निश्‍चित करण्याकरिता महाराष्ट्र व कर्नाटक येथील संबंधित सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा उभारण्याबाबत बार्टीमार्फत संशोधन व सर्वेक्षणावर आधारित नियोजनबद्ध व्यवस्था राबविणे. बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगारांना मागील पाच वर्षांच्या ऊस तोडीच्या कामाच्या आधारे ऊस तोड कामगार म्हणून अधिकृत दाखले देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंडे यांनी बार्टी संस्थेस भेट दिली व बार्टीमार्फत अनुसूचित जातींतील वंचित घटकांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांचा आढावा घेत, मार्गदर्शनपर सूचना केल्या. या बैठकीला बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, अपंग कल्याण आयुक्‍त प्रेरणा देशभ्रतार, निबंधक यादव गायकवाड, बार्टीच्या विविध विभागांचे प्रकल्प संचालक व अधिकारी उपस्थित होते.

नागपूर व औरंगाबाद येथे राज्य व लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांकरिता कोचिंग सेंटर सुरू करावीत. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी निवड परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेणे. आय.बी.पी.एस. स्पर्धा पूर्वप्रशिक्षणाकरिता दिव्यांग लाभार्थ्यांकरिता आरक्षण 4 टक्‍क्‍यांवरून वाढवून 5 टक्‍के करावे. मागणीचा अभ्यास करून कौशल्य विकास प्रशिक्षणाचे कोर्सेस आणि संस्थांची निवड करावी. जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची पारदर्शक यंत्रणा वेगवान करावी. समतादूतांसारख्या प्रभावी मनुष्यबळाकडून कार्यशाळांच्या संख्येत दुपटीने वाढ करावी. बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या प्रभावी, परिणामकारक आणि वेगवान प्रसिद्धीकरिता सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करण्यासाठी व्यावसायिक संस्थांची मदत घ्यावी.

याशिवाय बार्टीच्या औरंगाबाद येथील जागेत अनुसूचित जातीतील बालकांसाठी के.जी. टू पी.जी. शिक्षण व्यवस्था असलेल्या अत्याधुनिक सुविधांनी युक्‍त सैनिकी शाळेची आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच, येत्या पाच वर्षांत अनुसूचित जातीच्या पाच लाख लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा मानस असून, त्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मुंडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले. कैलास कणसे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.