पिंपरी) – वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच शहरात अवैध वृक्षतोडीचा धडाका सुरूच आहे. शाहूनगर, चिंचवड येथील एचडीएफसी कॉलनी परिसरात सुमारे 40 वर्षांपूर्वीचा वृक्ष बुंध्यासह तोडण्यात आला आहे. वर्षभरात हजारो झाडे तोडली असून पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोड लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होताना दिसत नाही.
पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वनराई नष्ट होऊन सिमेंटची जंगले उभी रहात आहेत. त्यामुळे शहरातील वातावरणात बदल होत आहे. दिवसेंदिवस शहरातील प्रदुषणात भर पडत असून मागील आठवड्यात भोसरी हवा सर्वांत जास्त प्रदूषित दिसून आली. शहरातील एक्यूआय (एयर क्वालिटी इंडेक्स) गेले कित्येक दिवस 160 च्या पुढे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासाठी आणि शहरातील हवा शुद्ध रहावी यासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविण्याची गरज असताना सर्रास वृक्षतोड होताना दिसून येत आहे. तर, पर्यावरण प्रेमींनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या विषयी एचडीएफसी कॉलनीतील रहिवासी पवन चौधरी म्हणाले की, या परिसरात सुमारे 40 वर्षे जुना वृक्ष तोडण्यात आला आहे. तो कोणी, कधी आणि कोणत्या कारणासाठी तोडला, याची काहीच माहिती नाही. तसे तो रस्त्यातही येत नव्हता. या परिसरातील पूर्ण वाढ झालेली तसेच 30 ते 40 वर्षे जुनी असलेली झाडे तोडली जात आहेत. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे.
मोशी ते आळंदी, इंद्रायणीनगर ते भोसरी तसेच शहरात इतर ठिकाणीही वर्षभरात अवैधरित्या वृक्षतोड होत आहे. वेळोवेळी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली जात आहे. मात्र, जुजबी कारवाई होते. किंवा अनेकदा कारवाई होताना दिसत नाही. शहर परिसरातील हजारो झाडे वर्षभरात तोडली आहेत. त्यात दोन कंपन्यांमधील एक ते दीड हजार झाडे. दत्तनगर येथील उद्यानातील झाडे तसेच मोशी ते आळंदी, इंद्रायणीनगर ते भोसरी येथील अवैध वृक्षतोडीचा समावेश आहे.
– प्रशांत राऊळ, पर्यावरण प्रेमी.
या पूर्वीही वृक्षतोड
नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियम, एमआयडीसी, जलशुद्धीकरण केंद्र रावेत, चिखली, मोशी, इंद्रायणी नगर व दोन कंपन्यांमध्ये अवैध वृक्षतोड झाली आहे. तर, प्रत्येक वर्षी 5 जून रोजी पर्यावरणदिन साजरा केला जातो. त्यानिमित्त वर्षभर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे ठरविले जाते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. दुसरीकडे शहरात बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल सुरू आहे.