बसस्थानक आवारातून प्रवासी पळवणाऱ्या खासगी एजंटवर कारवाईसाठी नियुक्ती
पुणे – एसटीकडून दिवाळीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांना यंदा प्रवाशांचा तुलनेने प्रतिसाद कमी आहे. यातच खासगी बस एजंटांकडून बसस्थानक आवारातून प्रवासी पळवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटीच्या महिला कर्मचारी रस्त्यावर उतरल्या असून, स्थानक आवारातील एजंटवर कारवाई करत आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबरदरम्यान जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (पूर्वीचे शिवाजीनगर), पिंपरी-चिंचवड या स्थानकांतून सुमारे 500 जादा गाड्यांची वाहतूक सुरू आहे.
मात्र, खासगी बसेसचे एजंट बस स्थानक आवारात येऊन प्रवाशांना खासगी गाडीने प्रवास करण्यास भाग पाडत असून, सध्या हे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होत आहे. यामुळे महसुलावरदेखील परिणाम होत आहे.
याच पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांचे गट केले आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड स्थानकांत ते गस्त घालत आहेत. याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाला असून, खासगी एजंटचा वावर कमी झाला आहे. एजंटना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.