नगर, (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील निंबाळे चौफुला परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एकास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत भारत जोर्वेकर (वय 19 रा. जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याचेकडून झेनॉन वाहनातून कुठलाही वाळू वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या महितीनुसार संगमनेर तालुक्यातील निंबाळे चौफुला परिसरात अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून आरोपीस पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्याच्याकडून अवैध वाळूसह टेम्पो असा २ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केले. याबाबत विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.