श्रीगोंदा – तालुक्यातील पेडगाव येथील नदीपात्रात पोकलेनच्या साहाय्याने 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या अंदाजे 20 ब्रास वाळूचा अवैध उपसा करून चोरी केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कामगार तलाठी आकाश नारायण काशिकेदार (वय 34) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 11 रोजी पेडगाव परिसरात नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन चालू असल्याची माहिती श्रीगोंदा- पारनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याच्या सूचना पेडगाव येथील मंडलाधिकाऱ्यांना दिल्या. कामगार तलाठी आकाश काशिकेदार आणि मंडलाधिकारी दिगंबर डहाळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेत सरस्वती पात्रात पाहणी केली असता पेडगाव येथील नदीपात्रालगत शेत गट नं 629मध्ये 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा अंदाजे 20 ब्रास वाळूसाठा आढळून आला.
तेथून जवळच सनी कंपनीचे पोकलेन मशीन मॉडेल नं एसवाय 215 सी – 9 एलसी, नंबर 195 इवाय 021681741 मशीन आढळून आले. कामगार तलाठी आणि मंडलाधिकारी अवैध वाळूउपसा झालेल्या ठिकाणचा, तसेच वाळूचा पंचनामा करत वाहन जप्त करण्यासाठी दि. 12 रोजी गेले असता पंचनामा केलेली वाळू चोरून नेत अवैध वाळूउपसा करणारे वाहन पसार केल्याने पोकलेनचा अज्ञात चालक व मालक यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.