लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुणे – नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांची आणखी प्रकरणे उघड होऊ लागली आहेत.
सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात भागीदारी फर्ममधील मूळ भागीदारांच्या बनावट सह्या करून बनावट दस्तऐवज करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाझीरकर यांच्या पत्नीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
संगीता नाझीरकर (वय 44, रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड), चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, रुषभ ओसवाल (सर्व, रा. मार्केटयार्ड) ऍड. सय्यद इनामदार (रा. वानवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (रा. बारामती) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संग्राम सोरटे व मधुकर विठोबा भरणे यांनी 2013 मध्ये ओम साई डेव्हलपर्स ही भागीदारी फर्म सुरू केली होती. त्यांचे नातेवाईक हनुमंत नाझीरकर व संगीता नाझीरकर यांनी चंद्रकांत निवृत्ती गरड (रा. हडपसर) हे त्यांच्या फर्ममध्ये सहभागी होऊ इच्छित असल्याचे सांगितले. त्यानुसार संगीता नाझीरकर यांचा भागीदारी हिस्सा 50 टक्के, गरड यांचा 20 टक्के आणि सोरटे व भरणे यांचा 15 टक्के भागीदारी हिस्सा निश्चित करण्यात आला. त्यांच्या फर्मने धायरी येथे एक जागा विकसनाकरिता घेतली त्या ठिकाणी सोरटे हे मे 2019 मध्ये गेले असताना त्यांना अनोळखी लोक दिसून आले.
चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही या फर्मचे 80 टक्के भागीदार असून त्यासाठी आम्ही नाझीरकर यांना 8 कोटी 23 लाख 61 हजार 420 रुपये दिल्याचे सांगितले, तशी कागदपत्रे त्यांनी सोरटे यांना दाखविली. त्यात सोरटे आणि इतर तिघांचा प्रत्येकी 5 टक्के हिस्सा दाखविण्यात आला होता. नाझीरकर व गरड यांनी सोरटे व भरणे यांना धायरी येथील प्रकल्पामध्ये आर्थिक नुकसान व्हावे व त्यांचा इतर भागीदार यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आपल्या संमतीशिवाय खोट्या सह्या करून, फर्ममधील 15 टक्के असलेला हिस्सा हा परस्पर 5 टक्के दाखवला.
तसेच, आर्थिक फसवणूक करण्यासाठी बनावट भागीदारी पत्र व समझोता करारनामा असे खोटे दस्तऐवज तयार करुन त्यावर सोरटे यांची बनावट सही केली. नोटरी सय्यद इनामदार यांनी हा खोटा दस्ताऐवज आपण समक्ष हजर नसताना नोंदवून घेतला व तो बनावट दस्त खरा म्हणून वापरला व फसवणूक केल्याचे फिर्यादीत सोरटे यांनी म्हटले आहे.
राज्यात बेकायदा संपत्तीचा संशय
नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जून 2020 मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांची पत्नी संगीता, मुलगी गीतांजली व मुलगा भास्कर यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते. नाझीरकर यांची राज्यात अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संशय असल्याने त्यांनी आयकर विभागालाही एक पत्र पाठवले आहे.