पुणे – नगरसेवक आणि पोलीस अधिकाऱ्यांशी स्नेह असल्याचे सांगत बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार कात्रज परिसरात वाढले आहेत. तुमच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्हाला ठराविक रक्कम द्या, अशी मागणी एक जोडगोळी मागील काही दिवसांपासून करत आहे. मात्र पोलिसांकडे तक्रार केली तर आपले बेकायदा प्लॉटींगवरही कारवाई होईल, या भितीने आजवर संबंधीत जोडगोळी विरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. मात्र काही प्लॉट मालकांनी एकत्र येऊन थेट पोलीसांमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे.
कात्रजमधील मांगडेवाडी, जांभुळवाडी आदी परिसरात डोंगरालगत किंवा डोंगरावरही बेकायदा प्लॉटींगचे काम सुरु आहे. यातील अनेक प्लॉट बेकायदा विकण्यात येत आहेत. काही जागा बीडीपीमध्ये गेली आहे तरी प्लॉटींग करुन ती विकली जात आहे. यामध्ये खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होत आहे. नेमकी हीच बाब हेरुन कात्रज परिसरातील दोन व्यक्ती बेकायदा प्लॉटींग करणाऱ्यांना ब्लॅकमेल करत आहेत.
तुम्ही बेकायदा प्लॉटींग करत असून त्याची माहिती महापालिका तसेच पोलिसांना दिली जाईल, असे त्यांना धमकावले जाते. यानंतर तक्रार न करण्यासाठी ठराविक रक्कम देण्याची मागणी केली जाते. याला काही जागा मालक बळी पडले आहेत. जागा मालकांनी पुढे येऊन तक्रार केल्यास संबंधित जोडगोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, तक्रारदाराला सर्वस्वी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन भारती विद्यापीठ पोलिसांनी दिले. जागा मालकांचा जर स्थानिक पोलिसांवर विश्वास नसेल तर ते पोलीस उपायुक्त अणि पोलीस आयुक्त कार्यालयातही दाद मागू शकतात.