अधिकृत परमिटरुम 210 तर बेकायदेशीर 300हून अधिक
पिंपरी – अतिशय बिकट परिस्थितीतून जात असलेल्या हॉटेल अँड परमिट रुम व्यावसायिकांना मंदीसोबतच अनधिकृत व्यावसायिकांचाही त्रास आहे. एकीकडे अधिकृत व्यावसायिक शासनाने सर्व कर, सर्व शुल्क भरुन, सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करत आहेत. दुसरीकडे सर्व नियमांना धाब्यावर बसवत बेकायदेशीरपणे हॉटेलात दारु विक्री करणाऱ्यांना मात्र कोणाचीच भीती नसल्याचे दिसून येत आहे.
बेकायदेशीरपणे दारु पाजणाऱ्या या हॉटेल्सची संख्या अधिकृत परमिट रुम्सपेक्षा खूप अधिक आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात 210 अधिकृत परमिट रुम आहेत, तर बेकायदेशीरपणे दारु सर्व्ह करणाऱ्या हॉटेल्सची संख्या सुमारे 350 इतकी आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार सांभाळताच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाने देखील धाडसत्र सुरु केले असून ठिक-ठिकाणी बेकायदेशीरपणे दारु विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई केली. तरी देखील छुप्या पद्धतीने हे धंदे सुरुच असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत. अशा ठिकाणी पत्रे मारुन तर बेकायदेशीर दारुचा व्यवसाय केला जातो. अनेक हॉटेल, चायनीजच्या गाड्या, लहान-लहान रेस्टॉरेंट देखील गुपचूप पद्धतीने दारु विक्री करतात किंवा ग्राहकांना आपल्या हॉटेलमध्ये बसून दारु पिण्याची परवानगी देतात.
दरात मोठी तफावत
अधिकृत परमिटरुम आणि अनधिकृत दारु पाजणाऱ्या हॉटेल्सच्या दरांमध्ये मोठी तफावत असते. अधिकृत परमिटरुम धारकांना दरवर्षी एक्साइज फीच्या रुपात सात लाखांहून अधिक रक्कम शासनाकडे जमा करावी लागते. अधिकृत व्यवसाय असल्यामुळे जीएसटी, इतर कर व शुल्क भरावे लागतात. यामुळे त्यांना स्वस्त दारु विकणे शक्य नाही. परंतु अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांना यापैकी काहीच करायचे नसते, त्यामुळे ते अधिकृतच्या तुलनेत खूपच स्वस्त दारु विकतात. याचा मोठा फटका अधिकृत परमिट रुम धारकांना बसत आहे.
बचावाची युक्ती
सध्या पोलिसांचे सामाजिक सुरक्षा पथक तसेच पोलीस ठाण्यांचे अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात धाडी घालत आहेत. यामुळे बेकायदेशीरपणे विक्री करणारे व्यावसायिक हॉटेलमध्ये स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहकाच्या मागणीनुसार बाहेरुन आणून देतात किंवा थोडा फार स्टॉक असला तरी तो स्टाफसाठी किंवा स्वतःसाठी आणल्याचे सांगून वेळ मारुन नेतात. पोलिसांनी कारवाई जरी केली तरी अशा अनेक पळवाटांनी ते कायद्याच्या कचाट्यातून सुटताना दिसतात.
या ठिकाणी सर्वाधिक बेकायदेशीर धंदे
नाशिक फाटा ते मोशी, दिघी ते डुडुळगाव, मोशी ते डुडुळगाव, चोविसावाडी, मॅग्झिन चौक, वाल्हेकरवाडी, ट्रान्सपोर्टनगर, काळेवाडी फाटा
महागड्या बाटलीत स्वस्त दारु
काही अधिकृत व्यावसायिकांनी सांगितले की, अधिकृत परमिट रुम धारकांना खरेदी-विक्री व स्टॉकचा पूर्ण हिशोब ठेवावा लागतो. नियमितपणे स्टॉकची तपासणी होते. तसेच अधिकृत परमिट रुममध्ये कंपन्यांकडून खरेदी केलेले मद्यच ठेवले जाते. अधिकृत व्यावसायिकांकडून यात जरा जरी कसूर झाला तर त्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला जातो. परंतु दुसरीकडे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या मोकळी सूट आहे. सध्या ब्रांडेड कंपन्याच्या बाटल्या, लेबल सगळे काही मिळते. एवढेच नव्हे तर अवघ्या दहा ते पंधरा हजारात बाटल्यांचे झाकण सील करण्याची मशीनही मिळते. यामुळे महागाच्या बाटलीत स्वस्ताची दारु भरुन बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे विकतात.