वाहनासह 8 लाख 29 हजारांचा मुद्देमाल घेतला ताब्यात
नगर/श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरतील घोडेगाव चौकात बेकायदा जिलेटीन कांड्या वाहतुक करणाऱ्या एक तरुणास ताब्यात घेतले असून, त्याकडून 8 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई श्रीगोंदा पोलीसांनी केली आहे.
आरोपी बाळासाहेब विठ्ठल जाधव (रा. श्रीगोंदा) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदा शहरातील घोडेगाव चौकात शनिवार (दि.1) रोजी विनापरवाना ऑपरेशन ऑलर्ट दरम्यान पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना गुप्त बातमी दारांकडून मिळालेल्या माहिती नुसार वाहन नं. एम.एच 16 बी.वाय-0957 यामध्ये अवैधरित्या जिलेटीन स्फोटकाच्या कांड्याची व इलेक्ट्रीक डिटोनेटर वाहतुक हिरडगाव फाटा ते श्रीगोंदा रोडने होत असल्याची माहिती समजली. त्यानुसार जाधव यांच्या पथकाने सोमनाथ कर्णवर, अंकुश ढवळे, अमोल आजबे, रवी जाधव, दादासाहेब टाके यांच्या पथकाने कारवाई केली.
या कारवाईत 20 हजार रूपये किमतीचे जिलेटिनच्या कांड्या व इलेक्ट्रीक डेटोनेटर असा वाहनासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करत आहेत.