सासवड – सासवड पोलीस ठाण्याला अतिक्रमणांचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला आहे. पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेकायदेशीररीत्या टपऱ्या टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून याकडे प्रशासनाचे मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होत आहे. पुणे-पंढरपूर महामार्गालगत पोलिस ठाण्याच्या मागच्या,उजव्या-डाव्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत.
यावर सासवड नगरपालिकेने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी होऊन देखील याकडे सासवड नगरपालिकेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत पोलीस प्रशासन म्हणतात की अतिक्रमणे हटवणे हे नगरपालिकेचे काम आहे. नगरपालिका म्हणते पोलिस प्रशासनाच्या जागेत होणारी अतिक्रमणे असल्यामुळे याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आजूबाजूला सर्व दुकाने अतिक्रमण आतली थाटलेली आहेत.
या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करावी अशी सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांकडून मागणी केली जात आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना याबाबत विचारणा केली असता, नगरपालिका कारवाई करणार आहे, असे उत्तर दरवेळी दिले जाते मात्र वर्षानुवर्षे ही अतिक्रमणांची संख्या वाढतच चाललेली आहेत.
या अतिक्रमणांबाबत सासवड नगरपालिकेशी संपर्क केलेला आहे. सासवड नगरपालिका दोन दिवसांमध्ये अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे. यासाठी त्यांनी पोलिस प्रशासनाची मदत मागितली असून पोलिस बंदोबस्ताकरिता पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा चालू आहे. सासवड नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईस पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त दिला जाईल. डी.एस.हाके, पोलीस निरीक्षक सासवड
6 डिसेंबरपर्यंत करणार कारवाई –
सासवड नगरपालिकेकडून 6 डिसेंबर पर्यंत अतिक्रमणांवरती कारवाई केली जाणार असून सासवड पोलीस स्टेशनसह सासवड शहरातील सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत. सासवड नगरपालिकेकडून अतिक्रमणांना कोणत्याही प्रकारे अभय दिले जाणार नसून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमण विरोधात मोहीम 6 डिसेंबर पर्यंत हाती घेतली जाणार आहे, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.