खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील राष्ट्रीय महामार्गालागत कारवाई
लोणावळा – न्यायालयीन कमिटीच्या आदेशानुसार लोणावळा नगरपरिषदेमार्फत शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या समोरील बाजूला राष्ट्रीय महामार्गालागत उभ्या असलेल्या अतिक्रमणावर सोमवारी (दि. 18)नगरपरिषदेने आपला हातोडा चालविला.
लोणावळा शहरात आणि विशेषतः शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लगत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभी आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने लोणावळा शहरासाठी गठीत केलेल्या न्यायालयीन कमिटीकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने कमिटीने या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना वजा आदेश नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिले होते.
जुलै महिन्यात अतिक्रमणाबाबत दिल्या होत्या नोटिसा
त्यानुसार या सर्व अतिक्रमणधारकांना जुलै महिन्यात नोटीस देत आपापली अतिक्रमणे काढून घेण्यास सूचित देखील करण्यात आले होते. मात्र त्यावर अंमलबजावणी न झाल्याने अखेर नगरपरिषदेने शनिवारी 24 तासांच्या मुदतीची नोटीस देत सोमवारी सकाळपासून आपल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केली.
प्रशासनाकडून सुरू असलेली या कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली. मात्र ही कारवाई न्यायालयीन कमिटीच्या आदेशानुसार सुरू असल्याने कारवाई थांबविता येणार नसल्याचे मुख्याधिकारी यांनी संबंधितांना सांगितले. लोणावळा नगरपरिषदेचे 150 कर्मचारी व अधिकारी, दोन जेसीबी, डंबर असा मोठा फौजफाटा पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये सहभागी झाला आहे.