प्रशासन अनभिज्ञ : रस्ते, पदपथांवरही व्यावसायिक अतिक्रमण
बोर्डाचे कर्मचारी, ठेकेदारांची राजरोस अनधिकृत बांधकामे
धनदांडग्यांना पाठीशी घालत सर्वसामान्यांवर होतेय कारवाई
देहूरोड – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बांधकामांना परवानगी नसताना मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी स्थानिक आजी-माजी नगरसेवकांबरोबरच त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहत आहेत. राजरोसपणे सुरू अतिक्रमण आणि बांधकामांना कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे छुपे पाठबळ तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. या परिसरात काही बेकायदा इमारती, मजले उभारण्यास आजी-माजी नगरसेवक, बोर्डाचे कर्मचारी, ठेकेदार यांचे पाठबळ असल्याचा आरोप देहूरोडकर करीत आहेत.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मुख्य बाजार पेठेसह सर्वच परिसरात विनापरवाना खुलेआम बांधकामे सुरू केली आहेत. लष्कर विभाग, रेडझोन हद्द असताना बांधकामे राजरोसपणे सुरू केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॅंटोन्मेंट बोर्डाकडून दिखाव्यासाठी किरकोळ कारवाई करीत धनदांडग्यांना पाठीशी घालताना मजल्यांवर मजले चढविले जात आहेत, परंतु या वाढत्या बांधकामांवर बोर्डाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित करीत आहेत.
मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकाचे दुरुस्तीच्या बांधकामावर बोर्डाचे कर्मचारी कारवाई करीत होते, असा भेदभाव का? यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कॅंटोन्मेंट बोर्डाला निवेदनही दिले होते. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही, असा संतापही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
गत पंचवार्षिकमध्ये मुख्य बाजारपेठेत लाखो रुपये खर्च करीत 40 फूट रस्ताचे रुंदीकरण करीत दुतर्फा पदपथ तयार करण्यात आले होते. या पदपथावर, रस्त्यांवर व्यापाऱ्यांची दुकानातील साहित्य, जाहिरात फलक, सिमेंट कॉंक्रिटीकरण, दुकानांसमोरील शेड, तर रस्त्यांवरच उभ्या वाहनांसह सुरू असणाऱ्या दुकानातील कामकाजाने अतिक्रमण करताना महावितरण कंपनीच्या खांबासह सुरक्षितेसाठी उभारलेल्या विद्युत खांबांच्या ताणावरही दुकानदारांनी कब्जा केला आहे. त्यामुळे केलेला 40 फुटी रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेत पादचाऱ्यासह मंडईमध्ये भाजीपाला खरेदी करण्यास जाणाऱ्या महिलांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
देहूरोड परिसरात आरसीसी बांधकामांसह पक्की बांधकामे बेधडक सुरूच आहेत. ही बांधकाम करणारे व ठेकेदार यांची सांगड घालत काही आजी-माजी नगरसेवक यांच्या मध्यस्थीने हे बांधकाम केली जात असल्याचे, तर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना मुदतवाढ मिळाल्याने बांधकामे, अतिक्रमणाकडे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन डोळेझाक करीत असल्याची चर्चा देहूरोडकरांमध्ये आहे. अशा धनदांडग्या बांधकामदारांना पाठीशी घालत बोर्ड प्रशासन डोळेझाक करीत असल्याने हे रॅकेट असल्याचा आरोप होत आहे. शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांविरोधात रिपाइं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
यासंदर्भात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्याशी भ्रमणध्वनी आणि दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. तसेच कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी शहरातील पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमण आणि बांधकामांबाबत अधिक बोलण्यास टाळले.
बांधकामांसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू
कॅंटोन्मेंट हद्दीत बांधकामांना परवानगी दिली जात नाही, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. नागरिकरण होत असल्याने बांधकामे ही होणारच आहेत. यामागेही बांधकामे झाली आहेत. पुढेही बांधकामे व घरांच्या दुरुस्तीची कामे होतील. त्यामुळे आम्ही वरिष्ठ पातळीवर बांधकामे करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे, असे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांनी सांगितले.