दिवसाढवळ्या सुरू असलेल्या प्रकाराकडे पोलिसांसह अन्य यंत्रणेचेही दुर्लक्ष
कात्रज – महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर उपनगरांतील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात विकासकामांना वेग दिलेला असताना अहिल्यादेवी ते महेश सोसायटी परिसरात मात्र पाइपद्वारे बाटल्याभरून हातभट्टी दारूची विक्री जोरात सुरू आहे. याकडे नगरसेवकांसह पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याने सामान्य नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना येथे मात्र अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अहिल्यादेवी चौक ते महेश सोसायटी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर के. के. मार्केट गेट समोरील बाजूस असलेल्या आंबील ओढ्याच्या पुलाजवळ अतिक्रमण करीत उघडपणे पाइपने बाटली भरून हातभट्टीची दारू विक्री केली जात आहे.
या परिसरामध्ये अनेक गृह निर्माण सोसायट्या असून हा भाग पुण्याईनगर परिसरामध्ये येतो. के. के. मार्केटच्या आंबील ओढा कडील पुलाच्या बाजूस अवैध धंदे सुरू असून याकडे पोलीस, महानगर पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग अशा कोणत्याच प्रशासनाचे लक्ष नाही.
आंबील ओढ्यावरील पुलाजवळ हा धंदा सुरू असून अनेक जण येथे मद्यपान करून रात्रीच्या वेळी पुलावरच लघुशंकेसाठी बसतात. धंदेवाले मुजोर भाषा व दांडगाईमुळे येथील सोसायट्यांतील रहिवासी तक्रार करीत नाहीत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा