मंचर-खडकी-पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथून 3 हजार 620 रुपयांचा बेकायदा विक्रीसाठी असलेला दारुसाठा मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. परंतु दारु विक्रेता पळुन गेला असुन पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे यांनी संबधिताच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, खडकी गावच्या हद्दीतील हॉटेल गणराज येथे एक व्यक्ती बेकायदेशीर बिगरपरवाना देशी विदेशी दारु विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे, नवनाथ नाईकडे, पी.एम.भुजबळ, अनिकेत विरणक हे कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना गणराज हॉटेलच्या पाठीमागच्या बाजुला ऊसाच्या शेताजवळ एक व्यक्ती दारु विक्री करत असताना दिसला.पोलीस आल्याची चाहूल लागताच तो तेथून पळून गेला. ग्रामस्थांनी दारु विक्री करणाऱ्याचे नाव रविराज नाथा भोर (रा.खडकी पिंपळगाव) असे सांगितले. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नवनाथ नाईकडे करत आहेत.