पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील बहुतांश नामांकित शिक्षण संस्थांकडून राबविण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेची पुणे विभागीय तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाने खुलासा मागविला आहे. त्यामुळे आता संस्थास्तरावरील नियमबाह्य प्रवेशाची पडताळणी होणार आहे. त्यातून नियमबाह्य प्रवेश समोर येण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य सीईटी सेल आणि राज्य तंत्रशिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यात पुण्यातील बहुतांश शैक्षणिक संस्थांकडून झालेल्या संस्थावरील प्रवेश नियमबाह्य झाले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
याबाबतचे निवेदन राज्य सीईटी सेलचे आयुक्त आणि तंत्रशिक्षण संचालकांना दिले होते. या प्रकाराची तातडीने चौकशी करावी अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यादव यांनी दिला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने शहरातील नामांकित शिक्षण संस्थांना परिपत्रक धाडले असून, त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. प्रभारी सहसंचालक एम. आर जाधव यांनी परिपत्रक काढले आहे.
दरम्यान, संस्था स्तरावर राबविण्यात आलेले प्रवेश नियमबाह्य पद्धतीने केल्याचे सिद्ध झाल्यास असे प्रवेश रद्द केले जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थाचालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.