आयआयटीचे विद्यार्थी हवा प्रदुषणावर तोडगा काढतील; राष्ट्रपतींना विश्‍वास

नवी दिल्ली: देशातील वाढत्या हवा प्रदुषणावर आयआयटी व एनआयटीचे विद्यार्थी त्यांच्या कौशल्यानुसार निश्‍चीत तोडगा काढतील आणि या प्रश्‍नावर ते अन्य विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती निर्माण करतील असा विश्‍वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनीधींच्या वार्षिक परिषदेत बोलताना त्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले की दिल्ली आणि देशातल्या काही प्रमुख शहरांमधील हवाप्रदुषणाची समस्या सध्या मोठी आहे. या संबंधात अनेक तज्ज्ञांनी निराशा व्यक्त केली आहे. धुके आणि प्रदुषित हवेमुळे आपली शहरे झाकोळून जात आहेत. त्यात लोकांना आपले भवितव्यही अंधकारी वाटू लागले आहे. अशा प्रसंगी आयआयटी व एनआयटीचे संशोधक आणि विद्यार्थी त्यावर आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार काही तरी प्रभावी तोडगा काढतील असा मला विश्‍वास आहे.

पंजाब आणि हरियानातील शेतकरी शेतात राब जाळत असल्याने दिल्ली राजधानी परिसरात या दिवसात कमालीचे हवा प्रदुषण निर्माण होते. त्यावर उपाययोजना करण्याची तयारी अनेक आयआयटी संस्थांनी दर्शवली आहे. आपल्यापुढे हे एक नवे आव्हान आहे. ते यापुर्वी इतक्‍या गांभीर्याने समोर आले नव्हते. पण त्यामुळे आता आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याने त्यावर काही प्रभावी उपाय योजले पाहिजेत. त्यासाठी तरूण संशोधकांनीही पुढे येऊन काही मार्ग काढला पाहिजे असे ते म्हणाले. देशातील मोठ्या जनसमुहाला दारिद्राच्या बाहेर काढण्याचेही एक मोठे आव्हान देशापुढे आहे त्यासाठीही या विद्यार्थ्यांनी काही योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.