नागपूर – आयआयएम नागपूर हे केवळ शैक्षणिक केंद्रच नाही तर जीवन घडवणारं केंद्र ठरेल. तसेच नागपूर आयआयएमचे वातावरण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठीच नव्हे तर रोजगार देण्याइतकं सक्षम बनवेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
इंडियन इॅन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या नवीन इमारत आणि परिसराचे लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे मंत्री नितीन राऊत, मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
रामनाथ कोविंद म्हणाले, नागपूर आयआयएम महिलांच्या प्रगतीसाठी देखील योगदान देईल.
हेच सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमीला खरं नमन असेल. स्पेशल इकोनामिक झोनमध्ये असलेल्या नागपुरात आयआयएम सारखी संस्था असणं हे देशातील पहिले उदाहरण आहे. महाराष्ट्र नेहमी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे केंद्र राहिले आहे. देशाच्या संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षा भूमी देखील नागपूरच आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
सुभाष देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याकडे आज एक पाऊल पडत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी आयआयएम नागपूर सोबत असल्याने चांगले परिणाम आयआयएम नागपूर देईल असा विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर आयआयएमसाठी राज्य शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.