अहमदाबाद – गुजरातमधून आलेले अहमद पटेल हे सोनिया गांधींचे जवळचे आणि काँग्रेसचे संकटमोचक मानले जात होते. मात्र आता अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा फैसल पटेल काँग्रेसचे संकट वाढवताना दिसत आहे.
फैसल पटेल यांनी ट्विट करून लिहिले की, ‘वाट पाहून थकलो. हायकमांडकडून कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नाही. त्यामुळे माझ्यासमोर इतर पर्याय खुले ठेवून मी पुढे जात आहे. हे ट्विट फैसल पटेल यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीशी जोडले जात आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करू शकतात, असेही बोलले जात आहे.
फैसल पटेल यांचे वडील अहमद पटेल हे अनेक दशकांपासून काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्व सोनिया गांधी यांच्या मर्जीतील होते. अहमद पटेल यांचा नोव्हेंबर २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू झाला.
आपल्या ट्विटमध्ये फैसल पटेल यांनी हायकमांडकडून आपल्याला कोणत्या प्रकारच्या प्रोत्साहनाची अपेक्षा होती याचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता, ते राजकारणात पदार्पण करू शकतात आणि ते काँग्रेसशिवाय अन्य राजकीय पक्षाच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
फैसल पटेल याआधी म्हणाले होते की, ‘हायकमांडची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवणार. माझी निवड भरुच क्षेत्र असेल, जो माझा परिसर आहे. विशेष म्हणजे फैसल पटेल यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही भेट घेतली आहे. त्या बैठकीत बरीच चर्चा झाली. अशा परिस्थितीत फैजल पटेल यांच्या या ट्विटमुळे भविष्यात ते आम आदमी पार्टीचा भाग बनण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.