अबाऊट टर्न: दुर्लक्ष…

हिमांशू

खरे तर स्वतःकडे दुर्लक्ष झालेले कुणालाच आवडत नाही. सध्याच्या लक्ष वेधून घेण्याच्या जमान्यात चर्चेत येण्यासाठी लोक काय-काय करतात हे आपण पाहतोच. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढून लाइक मिळवणाऱ्या आणि नको त्या गोष्टी “फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्या बहाद्दरांपासून निवडणुकीच्या प्रचारात मुद्दाम वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांपर्यंत संपूर्ण “रेंज’ आपल्याकडे उपलब्ध आहे. बदनाम झालो तरी त्यातून आपले “नाव’ होते, असा सिद्धांत उराशी बाळगून अनेकजण अनेक मार्गांनी प्रसिद्धीसाठी धडपडताना आपण पाहतो. पण काहीही केले तरी आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, आपण दुर्लक्षित होतो, हे लक्षात आलेले काही लोक मात्र खूपच नाराज आहेत.
निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्षित झालेल्या या समाजघटकाने लक्ष वेधून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा चालवलाय.

कोण ब्रिटनचा नागरिक आणि कुणी कॅनडाचे नागरिकत्व घेतलंय, अशा निरर्थक चर्चांच्या भडिमारामुळे आपले “कर्तृत्व’ झाकोळले जातंय, हे वास्तव या मंडळींना खूपच दुःख देऊन गेले. मग एकाच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असे या “कर्तृत्ववान’ लोकांनी ठरवले. ज्यांच्या चोख बंदोबस्तामुळे निवडणुका सुरळीतपणे पार पडतात आणि नेतेमंडळींना वक्‍तव्ये करण्याचे बळ मिळते, त्या पोलिसांचेच लक्ष वेधून घ्यायचा निर्धार या मंडळींनी केला. घड्याळाकडे न पाहता ड्युटी करणाऱ्या पोलिसांकडे त्यानिमित्ताने लोक लक्षपूर्वक पाहतील, असाही हेतू असावा.
पुण्यात हेल्मेटसक्‍तीला ज्यांचा अजिबात विरोध नाही, अशी माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सापडतील.

मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावणाऱ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. फुटा-फुटावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तरी आपला चेहरा दिसणार नाही आणि पोलीससुद्धा हेल्मेट न वापरणाऱ्या व्यक्‍तींऐवजी हेल्मेट वापरणाऱ्यांवर “फोकस’ करायला शिकतील, असा उदात्त हेतू असणाऱ्यांनी एका दिवसात… नव्हे अवघ्या सव्वा तासात “चेन स्नॅचिंग’चे सहा गुन्हे करून निवडणुकीच्या चर्चा रोखण्यात यश मिळवले. कोण निवडून येणार या विषयावर पैजा लावणारी माणसे अचानक “कायदा-सुव्यवस्था’ वगैरे विषयांवर बोलू लागली. सीसीटीव्हीला आणि त्याच्या मदतीने वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना केवळ हेल्मेटच दिसले. अर्थातच, पोलीस आता विनाहेल्मेटवाल्यांच्या मागे न लागता हेल्मेटवाल्यांकडे लक्ष वळवतील, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्‍त करताहेत. तिकडे येवल्यात याच दिवशी दुकानात चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर नाचल्यामुळे चर्चेत आले आहेत.

या चोरट्यांनी लाखोंच्या पैठण्या चोरल्या; पण रात्रीच्या अंधारात, बंद दुकानात नाचण्याचे कारण काय, हे कुणाला समजेना. अनेकांनी त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला; पण खरे विश्‍लेषण कुणालाच जमले नाही. नाचणाऱ्यांचा “कॅमेरा सेन्स’ पाहता, चेहऱ्याला रुमाल बांधून चोरी केल्यास सीसीटीव्ही काय करेल…? असा भाव नृत्यातून उमटला!
त्या तुलनेत धुळ्याच्या बॅंकेत चोरी करणारे चोरटे अगदीच अडाणी निघाले. त्यांना चोरायचे होते एटीएम मशीन. परंतु प्रशिक्षणाअभावी त्यांना मशीन ओळखता आले नाही आणि बिचारे पासबुक प्रिंट करायचे मशीन घेऊन आले. आपली चूक झाली, हे लक्षात आल्यावर त्यांनी मशीन रस्त्यातच टाकले आणि सुंबाल्या केला. चोरीचा प्रयत्न फसलाच; शिवाय “बिनडोक’ म्हणून ते नावारूपाला आले. अर्थात, निवडणुकीच्या धामधुमीत लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नांना त्यांनी हातभार लावलाच की!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.