पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हडपसर येथील एका उद्यानाचे उदघाटन होणार होते मात्र हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या उद्यानाला मुख्यमंत्र्यांचे नाव देण्यात निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून हे उद्यान उभारले आहे. आज या उद्यानाचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे समजते.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना भानगिरे यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उद्यानाचे उदघाटन होणार नसल्याने, एकनाथ शिंदे त्या ठिकाणी भेट देतील. त्यानंतर फुटबॉल मैदानाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे असे देखील भानगिरे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.