‘लॉकडाऊन’चा परिणाम : पवित्र रमजान महिन्याला सुरुवात
पिंपरी – पवित्र रमजान महिन्याला सुरवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून दररोज रोजे (उपवास) ठेवण्यात येतात. यंदा सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरातच नमाज पठण केली जात आहे. तसेच, कुराण धर्मग्रंथाचे देखील वाचन केले जात आहे.
रमजान महिन्यात अनेक मुस्लिम बांधव उपवास ठेवतात. त्यामुळे फळे, सुकामेवा, किराणा साहित्याची खरेदी केली जाते. सध्या शहरामध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवसातून चारच तास किराणा दुकाने, फळे व भाजीपाला केंद्र उघडे आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांची फळे, सुकामेवा व किराणा साहित्य खरेदीसाठी चांगलीच धावपळ उडत आहे.
मुस्लिम बांधवांच्या रोजामध्ये सूर्योदयापूर्वी “सहेरी’ केली जाते. तर, सूर्यास्तानंतर “इफ्तार’ करून उपवास सोडला जातो. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी फलाहाराने इफ्तार केला जातो. त्यामुळे शहरात फळांना मोठी मागणी आहे. मात्र, सध्या सकाळी 10 ते दुपारी 2 अशी चारच तास फळे मिळत असल्याने मुस्लिम बांधवांची गैरसोय होत आहे. भर उन्हात फळे, सुकामेवा खरेदीसाठी त्यांना घराबाहेर पडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, दररोज होणाऱ्या “इफ्तार’साठी सायंकाळी फळे मिळायला हवी, अशी मागणी केली जात आहे.
“व्हॉट्सअप’वरून कार्ड केले शेअर
पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांच्या घरोघरी विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने पैसा नाही. अशी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम रमजान महिन्यातील खरेदीवरही झाला आहे. रोजाची सूर्योदयापूर्वीची आणि सूर्यास्तानंतरची वेळ दर्शविणारे कार्डस यंदा प्रिंटेड स्वरूपात मिळालेले नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा आधार घेत मुस्लिम समाज बांधवांनी व्हॉट्सअपवरून हे कार्ड शेअर केले आहेत.
खजूर 160 रुपयांपर्यंत
रमजाननिमित्त लागणाऱ्या खजुरचा दर सध्या प्रति किलो 150 ते 160 रुपये इतका कमीत कमी आहे. खजुर पाच ते दहा किलो घेण्याकडेच मुस्लिम बांधवांचा कल असतो. त्यामुळे घाऊक दरात 130 रुपये प्रति किलो इतक्या दरात खजूर मिळते. रूहआबजा सरबतचा तुटवडा जाणवतो आहे. त्याऐवजी रोझ सिरप, खस, स्ट्रॉबेरी, कोकम आदी सरबतला चांगली मागणी आहे, अशी माहिती विक्रेते अविनाश आथवानी यांनी दिली.