आनंदाने जगायचे असेल तर!

समकालीन स्थितीमध्ये माणूस नावाच्या प्रगतशील प्राण्याची वानवा सगळीकडे जाणवत आहे. माणसाच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याचे संघर्ष अटळ असतात. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्‍य या प्रत्येक पातळीवरचा संघर्ष वेगवेगळा असतो. आज वार्धक्‍यातील आरोग्य हा विषय अत्यंत गंभीर झाला आहे.

नात्यातील वीण वाढत्या वयाबरोबर अधिक पक्की होणे अपेक्षित आहे.सध्याचे चित्र मात्र तसे दिसत नाही. सगळ्यांना धावायचे आहे, यामध्ये नात्यांची अंत्ययात्रा निघाली तरी हरकत नाही अशी धारणा होत आहे. वाढत्या वयाच्या बरोबर काही आजार जडणार, याची जाणीव वृद्धांना होणे अपेक्षित असते. काहींना ती होतेही. मात्र, तरी ते त्याची योग्य ती काळजी घेत नाहीत. कारण त्यांचा आप्तांवर गाढ विश्‍वास असतो.

मात्र एकदा का ते आपल्या आजाराशी झुंजू लागले की मग त्यांना टाळूवरचे लोणी खाणे या प्रकारची जाणीव होते. परिस्थितीमधून मार्ग काढण्याची तयारी असली तरी वेळ आणि शरीर यांचा ताळमेळ कठीण होऊन जातो. मग येणाऱ्या दिवसागणिक मरणाची याचना करण्याशिवाय पर्याय नसतो.

लेकरांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणाऱ्या आई-वडिलांची संपत्तीवरून ज्यावेळी पोटची लेकरे वाटणी करतात, त्यावेळी त्यांच्यावरील आघाताची कल्पना अशक्‍य आहे. या अकल्पित चित्रामुळे त्यांना जगण्यापेक्षा मरणं समीप वाटू लागते.

शेवटी, वार्धक्‍य आनंदाने जगायचे असेल तर आपले अवलंबित्व कमी करीत म्हातारपणासाठी काही पुंजी ठेवायला हवी. जिवंतपणी चार चौघांमध्ये स्वत:ची बोली लावून घेण्यापेक्षा आपला हिस्सा बाजूला काढून ठेवणे कधीही चांगले!

– श्रीकांत येरूळे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)