देश बदलायचा असल्यास आधी गाव बदला : हजारे

सरपंच ग्रामसंसद महासंघ या संस्थेची सुरुवात

पारनेर –
लोकशाहीमध्ये ग्रामसभा सर्वोच स्थानी आहे. मग विधानसभा व लोकसभा आहे. गांधीजी म्हणत होते, खेड्याकडे चला. तुम्हाला देश बदलायचा असेल तर आधी गाव बदला मग देश बदलेल. उंच इमारती बांधून आणि रस्ते करणे म्हणजे विकास नव्हे. आधी गाव मग गावातील माणूस बदलावा लागेल. आपले कर्तव्य जाणून आणि माणूसपण टिकून गावात आपण काम केले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राळेगणसिद्धी येथे सरपंच ग्रामसंसद महासंघ या संस्थेची सुरूवात करण्यात आली. प्रारंभ व राज्यातील 100 ग्रामपंचायतच्या सरपंचांना शिबिरात मार्गदर्शन करताना अण्णा बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत खजिना या वेबसाईट सुरू अण्णांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष सरपंच रोहिणी गाजरे, उपाध्यक्ष सरपंच कैलास पाठारे, संघटक सरपंच प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अण्णा पुढे म्हणाले, स्वार्थ सोडला पाहिजे. आता तुम्ही राळेगणमधील लोकांशी चर्चा करा, काय होते पूर्वी गावात आणि आता कसे गाव घडले ते जाणून घ्यावे. या गावात दलित समाजातील लोकांचे कर्ज त्यांच्या जमिनीत श्रमदान करून, या गावकऱ्यांनी ते कर्ज फेडले. पूर्वीपासून सर्व लोक एकत्र जेवण व उत्सवानिमित्त एकत्र आहेत. जात पात विसरून काम केले पाहिजेत. मानवता हे मूळ मानून काम केले पाहिजे. या गावात पूर्वी 40 हातभट्ट्या होत्या, आता बरीच वर्षे झालीत दारू, सिगरेट, विडी मिळत नाही. लोकांनी त्याची होळी केली. आज गाव व्यसनमुक्त आहे. भाषण करून देश बदलत नाही. भाषणाला कृतीची जोड हवी.

माझ्याकडे पहा कुठे बॅंक बॅलन्स नाही. मी ठरवले लग्न करायचे नाही. मात्र माझा प्रपंच सुटला नाही छोटा करायचा तो आता मोठा परिवार झाला. ध्येययवादी बनले पाहिजे. जनतेनी आंदोलने केली मी निमित्त होतो. त्यातून माहितीचा अधिकार व ग्रामसभेला ज्यादा अधिकार हा कायदा आला. आता लोकपाल कायदा पण आला. हाच जनतेचा रेट्यातून मिळालेला विजय आहे. आता तुम्हाला माझे सांगणे आहे, तुम्ही सर्व सरपंच मिळून एक वकिलांची टीम तयार करावी, जेणेकरून गोरगरीब जनतेचे प्रश्‍न सुटतील. कुणी अर्ज दिलेल्यानेही प्रशासन काम करत नसल्यास त्या दिरंगाईविरुद्ध गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोर्टात खेचण्याचा अधिकार जनतेला आहे. मात्र तो त्यांना माहित नाही. तुम्ही पाठपुरावा करावा असेही अण्णा म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.