लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच 2024 मध्येही देशाच्या पंतप्रधान पदावर पाहायचे असल्यास उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना पुन्हा निवडून द्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी आज आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्यात केले.
शुक्रवारी लखनऊ येथे एका मेळाव्याला संबोधित करताना शाह म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत, परंतु यूपीला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी अजून पाच वर्षांची गरज आहे. पीएम मोदी हे देखील यूपीचे खासदार आहेत आणि जर तुम्हाला त्यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर तुम्हाला योगी आदित्यनाथ यांना यूपीचे मुख्यमंत्री बनवावे लागेल. मला खात्री आहे की तुम्ही पीएम मोदींना पुन्हा संधी द्याल.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीची तारीख भाजपाचे लोक जाहीर करणार नाहीत, असे अखिलेश यादव म्हणाले होते. पण मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्याच सरकारने रामभक्तांना गोळ्या घातल्या होत्या. पण आमच्या राजवटीत लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होणार आहे. पूर्वी यूपी अर्थव्यवस्थेत सातव्या क्रमांकावर होते, पण भाजपा सत्तेत आल्यानंतर यूपी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असा दावा करतानाच त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.
सपा आणि बसपा सरकारने अनेक वर्षांपासून यूपीला त्यांचे खेळाचे मैदान बनवले होते. लोक यांना कंटाळून राज्यातून पलायन करत होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. यूपीमध्ये आता महिला रात्रीही दागिने घालून स्कूटी चालवू शकतात, इतक्या त्या सुरक्षित आहेत. तसेच आमच्या कार्यकाळात गरिबांना पक्की घरे आणि वीज देण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.