कात्रज -पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावातील निंबाळकरवाडी गावठाणातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अखेर गावकऱ्यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. हवं तर आमची घरं पाडा, अंगणाची जागा देतो, मोबादला पण नको. पण, आता तरी रस्त्याचे रुंदीकरण करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने गेली कित्येक वर्षे रेंगाळलेला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावाच्या या एकोप्याची चांगली चर्चा शहरच नव्हे तर जिल्ह्याभरात होत आहे.
निंबाळकरवाडी गावठाणातील रस्ता केवळ 7 ते 8 फुटाचा होता तो आता 22 फुटाचा होणार आहे. यासाठी रस्त्यालगतची किमान अर्ध्या किलोमीटर अंतरातील गावकऱ्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यामध्ये 15 ते 16 घर व जागामालकांनी आपली जुनी कच्ची-पक्की घरे स्वतःच्या स्व-इच्छेने पाडण्यास परवानगी दिली.
यामध्ये प्रामुख्याने अमोल निंबाळकर, एकनाथ भाटे, आबासाहेब आखाडे, तानाजी निंबाळकर, सतीश निंबाळकर, दिलीप निंबाळकर, काशिनाथ भाटे, मनेश सणस, दत्ता सणस, पांडुरंग बालवडकर, अनिल निंबाळकर, हौसाबाई निंबाळकर, सनी निंबाळकर, कैलास निंबाळकर, निर्मल डांगी यांच्यासह कामठे परिवार या जागामालकांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता रस्त्यासाठी जागा दिली आहे. हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी माजी उपसरपंच अजित निंबाळकर यांनी पुढाकार घेतला तर संतोष बालवडकर, रामदास खोपडे, किरण निंबाळकर यांनी सहकार्य केले.
एकमुखी ठराव…
गावठाणांतून समर्थगडकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद होता. या रस्त्यावरून दाटीवाटीने एकच मोटार जाऊ शकत होती. हा रस्ता सुरुवातीला चढाचा असल्यानेही अपघात घडायचे, त्यामुळे रस्ता रूंद होणे गरजेचे होते; परंतु, जागेअभावी हा प्रश्न सुटत नव्हता. अखेर, याकामी निंबाळकर वाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वतःची जागा रस्त्यासाठी एकमुखी ठराव करीत जागा देण्याची तयारी दर्शविली. यामुळे रस्ता रुंदीकरणातील अडथळा दूर झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.
अनेक वर्षांपासून रस्ता अरूंद असल्याने याठिकाणी अडचण होत होती. गावाच्या विकासासाठी दळणवळण महत्त्वाचे असल्याने, रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. रस्त्यालगतच्या प्रत्येक जागामालकाला जागा सोडून रस्ता मोठे करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. आता, जवळपास हा रस्ता 20 ते 22 फूट रूंद होणार आहे.
– अजित निंबाळकर, माजी उपसरपंच, गुजर-निंबाळकरवाडी