टोमॅटोबाबत अफवा पसरवाल तर, खबरदार….

किसान सभेचा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा

पुणे(प्रतिनिधी) – टोमॅटो पिकावर आलेल्या अज्ञात विषाणूचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

वनस्पती बाधक विषाणू व प्राणीबाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. पण, या अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडिओ एडिट करून वापरले जात आहेत. हा गंभीर प्रकार आहे. हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बंगळुरू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांत याबाबत निदान होईल, अशी अपेक्षा आहे. कृषी विभागाने या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून आजारावरील उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून द्यावे, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.