बारामतीः शहरातील रस्त्यांवरून नागरिकांना सुरक्षित चालता यावे, यासाठी रस्त्याच्या बाजूला फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवरून दुचाकीस्वारच सर्रासपणे दुचाकी चालवत असल्याने तशा तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी देखील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवरून अनेक दुचाकी जात असल्याचे दिसत आहे. बारामती शहर पोलसांनी बेशिस्त वाहन चालकांना लगाम लावण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी वाहनांवर असलेली फॅन्सी नंबर प्लेटवर दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली. तसेच अशा वाहनांवर चक्क सरकारी नियमाप्रमाणे सवलतीच्या दरांतमध्ये नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला.
तसेच रस्त्यावर विक्रेत्यांकडून करण्यात आलेली व्यावसायिक अतिक्रमणे, रस्त्यावर अस्ताव्यस्त लावण्यात येत असलेली वाहने आदींवर देखील पोलिसांनी कायदेशीर कारवाया केल्या आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना एका रेषेत पार्क करण्यासाठी नायलॉन दोरीचा प्रभावी उपक्रम देखील पोलिसांनी राबविला आहे. त्यामुळे बारामती शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, आता दुचाकीस्वार फुटपाथवरून दुचाकी चालवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच वाहतूक विभागाच्या वतीने अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.